Ad will apear here
Next
आधी केले, मग सांगितले...
दासबोधातील व्यवस्थापन व नेतृत्वविषयक संकल्पनांबद्दलची प्राथमिक माहिती आपण ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेच्या पहिल्या भागात घेतली. या भागात आपण समर्थ रामदास यांच्या चरित्राचे महत्त्वाचे टप्पे आणि दासबोध या ग्रंथाच्या रचनेचा थोडक्यात परिचय करून घेऊ. ‘आधी केले व मग सांगितले’ असे त्यांनीच लिहून ठेवले आहे आणि त्या सूत्राचा तंतोतंत अवलंब करूनच त्यांनी दासबोधासह सर्व साहित्य लिहिले आहे. 
.............
दासबोधातील व्यवस्थापन व नेतृत्वविषयक संकल्पनांबद्दल प्राथमिक माहिती आपण गेल्या भागात घेतली. त्याबद्दल आपण या लेखमालेतून सविस्तर पाहणार आहोत; मात्र ते पाहण्यापूर्वी समर्थ रामदासांच्या चरित्राचे मोजके व महत्त्वाचे टप्पे पाहू. त्याचबरोबर दासबोध या ग्रंथाच्या रचनेचा अतिशय थोडक्यात परिचय करून घेऊ. समर्थ संत रामदासांचा जन्म इ. स. १६०८मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी झाला. त्यांचे मूळचे नाव नारायण ठोसर. वयाच्या बाराव्या वर्षी संसाराच्या पाशात न अडकता हा मुलगा जांब या गावापासून पायी, पळत, पोहत अशा अनेक प्रकारे नाशिकजवळील टाकळी या गावी पोहोचला. इ. स. १६२० ते १६३२ या १२ वर्षांच्या कालावधीत प्रखर आध्यात्मिक साधना व अध्ययन करून, तसेच इष्टदैवत असलेल्या श्रीरामचंद्राचा साक्षात्कार करून ते आपल्या पुढील कार्याला सिद्ध झाले. रामाचे भक्त म्हणून त्यांची शेवटपर्यंत दास्यत्वाचीच भूमिका होती. सगळीकडे लोकमान्य, राजमान्य व विख्यात होऊन समर्थ ‘मोठा नेता’ म्हणून मान्यता पावले. तरीदेखील ‘रामाचा दास’ ही नम्र भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. मोठा नेता असून अहंकाराचे वारेदेखील लागून दिले नाही. संपूर्ण भारत त्यांनी इ. स. १६३२ ते १६६४ या बारा वर्षांत पिंजून काढला. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत प्रवास करून त्यांनी राजकीय व सामाजिक स्थितीचा अत्यंत जवळून अभ्यास केला. तेवढ्यावरच ते गप्प बसले नाहीत, तर त्यावर उपाय म्हणून लोकजागृती व लोकशिक्षणाची केंद्रे त्यांनी भारतभर उभी केली. ज्या काळात परकीय सत्ता होती, दुसऱ्या गावी जाणेदेखील अवघड होते, त्या काळात संपूर्ण भारतभर ११०० मठांचे/केंद्रांचे जाळे उभारणे हे एखाद्या मोठ्या ‘समर्थ’ नेत्याचेच काम असू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी इ. स. १६४९मध्ये अनुग्रह/शिष्यत्व दिले. इ. स. १६७८मध्ये त्यांनी मनोबोध/मनाचे श्लोक ही २०० ओव्यांची, पण वर्तनात/प्रवृत्तीत बदल घडविण्याचे अफाट सामर्थ्य असलेली अलौकिक रचना केली. इ. स. १६८२मध्ये या महान संताने सज्जनगड (जि. सातारा) येथे आपला देह ठेवला. तेथे त्यांचे समाधिस्थान आहे.

आता मुख्यतः आपल्याला त्यांच्या दासबोध या ग्रंथाचा थोडक्यात परिचय करून घ्यायचाय. ‘दासबोध’ हा ग्रंथ म्हणजे काही पुस्तके वाचून लिहिलेला किंवा कशावर तरी भाष्य असणारा ग्रंथ नसून, ज्ञान व मुख्यतः स्वतःचा अनुभव व कार्य या आधारे लिहिलेला अलौकिक, आध्यात्मिक ग्रंथ आहे. ‘आधी केले आणि मग सांगितले’ असे समर्थच एके ठिकाणी म्हणतात. हा कोणत्या तरी स्थानी बसून एकटाकी लिहिलेला ग्रंथ नाही, तर प्रत्यक्ष स्वतःचे अनुभव व कार्य वाढेल त्याप्रमाणे टप्प्याटप्याने सिद्ध केलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रामदासांनी तीन टप्प्यांत सिद्ध केला. त्याचा प्रारंभ १६३२ साली व पूर्तता १६८० साली झाली. ही रचना सिद्ध होण्यासाठी त्यांना तब्बल ४८ वर्षे लागली. कारण आध्यात्मिक अनुभव स्वतःला आल्याशिवाय व व्यावहारिक/सामाजिक कार्य प्रत्यक्ष उभे करेपर्यंत ते लिहायचे नाही, हा दंडक त्यांनी पाळला. ‘दासबोधा’चा पहिला टप्पा म्हणजे ‘जुना दासबोध किंवा २१ समासी दासबोध’, जो त्यांनी १६३२ साली लिहिला. त्यात केवळ विवेक, वैराग्य व तत्सम आध्यात्मिक अनुभवांचे विषय आहेत. अनुभव, ज्ञान, कार्य वाढत गेल्यावर त्यांनी दासबोध सात दशकांपर्यंत (प्रत्येकी १० समासांची सात दशके म्हणजे ७० समासांचा) विस्तारला. आपण ज्यातील ओव्या मुख्यतः पाहणार तो दासबोध म्हणजे सध्याचा प्रचलित, २० दशकांचा  म्हणजेच २०० समासांचा दासबोध त्यांनी इ. स. १६८० साली, तब्बल ४८ वर्षांनी सिद्ध केला. दासबोधाच्या ७७५१ ओव्यांमध्ये समर्थ रामदासांसारख्या महान संतांच्या आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यवहारदृष्टी, संघटनात्मक विचारधन, नेतृत्वविषयक/व्यवस्थापनविषयक संकल्पना विस्ताराने आल्या आहेत. मी अनेक वर्षे अभ्यास करून, २०० सामासांमधील ३५ सामासांवर म्हणजे जवळपास ११०० ओव्यांवर संशोधन केले आहे. या ओव्यांमध्ये उत्तम व्यवहार, व्यवस्थापन कसे करावे, इत्यादी विषय आले आहेत. 

समर्थ संत रामदास ३५० वर्षांहून अधिक काळापूर्वी ‘दासबोध’ आणि इतरत्र जे विचार मांडून गेले, ते आजच्या आपल्या आधुनिक जीवनाच्या व्यवस्थापन विषयासह सर्व विषयांना स्पर्श करणारे आहेत. त्यातील मूलभूत विचार, विशेषतः ‘माणूस’ या संकल्पनेच्या संदर्भातील अनेक समस्यांची समर्पक सोडवणूक करण्यास सक्षम आहेत. पहिला प्रश्न असा येतो, की ‘दासबोध’ ग्रंथात अशा कार्यसंस्कृती, संघटननेतृत्व, विकासविषयक संकल्पना येण्याचे रहस्य काय? याचे कारण असे, की संत रामदासांनी त्या काळात स्वतः फार मोठे संघटनात्मक कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात उभे केले. शिवाजी महाराजांच्या राजकीय चळवळीला पूरक असे हे कार्य म्हणजे स्वराज्याला लायक असे नेते व उत्तम कार्यकर्ते, ‘माणसे’ तयार करणे. उत्तर भारतापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत या कार्याचे जाळे त्यांनी सुमारे ११०० मठ/केंद्रे उभारून तयार केले. ही खरी म्हणजे लोकशिक्षण व लोकजागृतीची केंद्रे होती व याद्वारे त्यांनी समाजात मोठी जागृती करून हजारो नेते व लक्षावधी कार्यकर्ते तयार केले. हे एवढे मोठे ‘नेटवर्क’ करताना त्यांनी व्यवस्थापनविषयक अनेक तत्त्वे स्वतः वापरली व अनेक कर्तबगार नेते तयार करून त्यांच्याकरवी हे मोठे कार्य उभे केले, वाढवले व त्यांच्या पश्चात टिकवलेदेखील. असा हजारो नेत्यांचा नेता, त्याला ‘समर्थ’ म्हणतात. असे महान कर्तृत्व करून, जगड्व्याळ, व्यापक कार्य कसे उभे करावे त्याचे एक सूत्रच दासबोधात पाहायला मिळते. आजदेखील एखादी जागतिक संस्था उभारताना हेच सूत्र वापरले जाते, हे आपल्या लक्षात येईल. अशी जागतिकीकरणासारख्या संदर्भातील काही सूत्रे आपण या सदरात पाहणार आहोत. त्यांचे सारे कार्य त्यांनी अशा अनेक सूत्रांतून उभे केले होते व म्हणूनच ते तपशीलात हे सारे अचूक मांडू शकले. ‘आधी केले व मग सांगितले’ असे त्यांनी लिहून ठेवले आहे. जे त्यांनी स्वतः केले नाही, अनुभवले नाही, त्यावर ते कधीही बोलले नाहीत, ते कधीही समर्थांनी लिहिलेले नाही, मग तो आध्यात्मिक विषय असो, की संघटनात्मक चळवळ वा त्याची व्यवस्थापनाची सूत्रे असोत. त्यातील बारकावे पाहिले की आपल्या हे सहज लक्षात येईल. त्याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या. 

श्रीनिवास रायरीकर
- श्रीनिवास रायरीकर

(लेखक ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे माजी संचालक आहेत. ते दासबोधाचे अभ्यासक असून, ‘दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास’ या विषयावर ते कार्यशाळा घेतात.)

(दासबोध बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZTJBL
Similar Posts
माणूस अपयशी का होतो? समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातून सांगितलेली व्यवस्थापनाची, नेतृत्वगुणविषयक, तसेच व्यक्तिविकासाची काही सूत्रे आपण ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेतून पाहिली. माणूस अपयशी का होतो याची समर्थांनी केलेली कारणमीमांसा आणि अपयश टाळण्यासाठी सांगितलेली सूत्रे, कार्यसंस्कृती आणि व्यक्तिविकासाबद्दल केलेले भाष्य
संघबांधणी कशी करावी? ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेत आपण आतापर्यंत ग्लोबलायझेशन, नेतृत्वगुण आदींसंदर्भात समर्थांनी दासबोधात लिहून ठेवलेल्या विचारांबद्दल चिंतन केले. संघबांधणी (टीम बिल्डिंग) कशी करावी, या संदर्भात समर्थांचे विचार काय होते, हे आजच्या भागात पाहू या.
समर्थांचा नेतृत्व आराखडा प्रत्येक गोष्ट कष्टाने, प्रयत्नाने साध्य होणारी आहे. जगात अशक्य असे काही नाही. नशिबाने नव्हे तर ‘कष्टाने, ज्ञानाने, प्रयत्नाने व अचूक प्रयत्नाने माणूस यशस्वी व मोठा होतो,’ असा समर्थांचा संदेश आहे. नेतृत्वगुणाबद्दलची तत्त्वे समर्थांनी ३५० वर्षांपूर्वीच दासबोधामध्ये सांगून ठेवली आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू -
‘ग्लोबलायझेशन’संदर्भात दासबोध काय सांगतो? जागतिकीकरण अर्थात ग्लोबलायझेशन या शब्दाचा अनुभव आपण आजच्या जगात अगदी दररोज घेत आहोत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलेले काही विचार या ग्लोबलायझेशनच्याही युगात लागू पडतील, असे आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेच्या आजच्या भागात आपण त्याबद्दलच माहिती घेऊ या...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language